जळगावमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर महसूलमंत्री बावनकुळे

पातरखेडे येथे प्रत्यक्ष पाहणी; चटणी-भाकरीचा आस्वाद घेत शेतकऱ्यांशी साधला मनमोकळा संवाद

एरंडोल : तालुक्यातील पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, पिकांची परिस्थिती आणि शेतीसमोरील अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी जलसंपदा मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार ॲड. अमोल पाटील, विधानपरिषद सदस्य नंदकिशोर महाजन, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह महसूल व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तालुक्यात पावसाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीचा खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. कापूस फुलोरा अवस्थेत असताना पावसाअभावी पिकाची वाढ खुंटली असून, मका व सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याअभावी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या बांधावरच संवाद

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा व अडचणी महसूलमंत्र्यांसमोर मांडल्या. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ना. बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

विशेष म्हणजे, यावेळी शेतकऱ्यांनी घरून आपुलकीने आणलेल्या चटणी-भाकरीचा बांधावरच सर्व मान्यवरांनी आस्वाद घेतला. मंत्री आणि शेतकरी यांच्यातील हा साधेपणाचा क्षण उपस्थितांच्या विशेष लक्षात राहिला. चटणी-भाकरीचा आस्वाद घेताना शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

मदतीसाठी शासन कटिबद्ध

दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या पिकांची व परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना व मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन ना. बावनकुळे यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या बांधावर बसून झालेला हा संवाद केवळ पाहणीपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात शासन सहभागी असल्याचा विश्वास देणारा ठरला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

पातरखेडे येथील या पाहणीमुळे प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणींची जाणीव झाली असून, आता शासनाकडून मदतीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button