स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी निःशुल्क अन्न सुरक्षा प्रशिक्षण उत्साहात संपन्न

५०० खाद्यपदार्थ विक्रेत्यांना FSSAI–FoSTaC अन्न सुरक्षा प्रमाणपत्राचे वाटप
पुणे ( विशेष प्रतिनिधी ) : – पुणे शहरातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांनी नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न उपलब्ध करून द्यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले निःशुल्क अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम दि. ३ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उत्साहात संपन्न झाला.
नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (NASVI) महाराष्ट्र, Nestlé India, FSSAI, FDA महाराष्ट्र राज्य आणि पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन तीन दिवस पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवन कॉन्फरन्स हॉल, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे येथे, तर दोन दिवस हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, पुणे महानगरपालिका, सारसबाग रोड, सणस ग्राउंडसमोर, पुणे येथे करण्यात आले.
या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या एकूण ५०० स्ट्रीट फूड विक्रेत्यांना अन्न हाताळणी, वैयक्तिक स्वच्छता, खाद्यपदार्थांची सुरक्षित साठवणूक, विक्री परिसराची स्वच्छता, ग्राहकांना सुरक्षित अन्न देण्याच्या पद्धती तसेच अन्न सुरक्षा कायदे व नियमांचे पालन याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
स्वच्छता व अन्न सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या ॲप्रन, कॅप, हातमोजे, टॉवेल, ब्रश, मॉप, साबण आदी साहित्याचा योग्य वापर याबाबतही प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व ५०० विक्रेत्यांना FSSAI–FoSTaC मान्यताप्राप्त अन्न सुरक्षा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास दिगंबर भोगावडे, सहआयुक्त (अन्न), FDA पुणे विभाग , एन. आर. सरकटे, सहाय्यक आयुक्त, FDA पुणे , जय भद्र मिश्रा, प्रादेशिक कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर, Nestlé India Limited , राजीव जी, NASVI प्रशिक्षक; तसेच दिपक मोहिते, अध्यक्ष, पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्य व NASVI लीडर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिका नगर पथ विक्रेता समितीच्या सदस्य व पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्याच्या महासचिव श्रीमती भीमाबाई लाडके, तसेच सागर दहिभाते, गजानन पवार, निलम अय्यर, मंदार धुमाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिल शेवाळे, महासचिव अभय अगरवाल, संघटक सचिव संजय कांची, ऋषिकेश सावंत आणि पुणे शहर कार्यकारिणी सदस्य अतुल दिघे,अमोल शिंदे, शंकर ठाकूर, कैलास मगर, विनय तिवारी, माधुरी मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“स्वच्छ भोजन – स्वस्थ जीवन” या संदेशातून विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षणामुळे पुणे शहरातील स्ट्रीट फूड व्यवसाय अधिक सुरक्षित, स्वच्छ, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात मोठमोठ्या कंपन्या खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर उतरल्याने पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रेत्यांसमोर व्यवसाय टिकवून ठेवण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत अन्न सुरक्षा, स्वच्छता, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
“हे प्रशिक्षण खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे ठरले असून, प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान व्यवसायात प्रत्यक्ष वापरून ग्राहकांना अधिक सुरक्षित व स्वच्छ अन्न देण्यास मदत होईल,” अशा प्रतिक्रिया सहभागी विक्रेत्यांनी व्यक्त केल्या.
ही माहिती पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व NASVI लीडर श्री. दिपक मोहिते यांनी दिली.






