शास्त्री फार्मसी महाविद्यालयात सायबर सुरक्षा व आर्थिक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात सायबर सुरक्षा व आर्थिक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न
एरंडोल : शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच आर्थिक साक्षरता व आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने ‘सायबर सुरक्षा व आर्थिक जनजागृती’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजीव पवार यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि आर्थिक शिस्तीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे आव्हानही गंभीर बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पवार यांनी ऑनलाइन आर्थिक फसवणूक, फिशिंग, बनावट लिंक, ओटीपी चोरी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सायबर गुन्ह्यांची उदाहरणांसह माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, एटीएम पिन किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती इतरांना देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच डिजिटल व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार नोंदविण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात आर्थिक साक्षरतेवर विशेष भर देण्यात आला. उत्पन्न व खर्चाचे नियोजन, गरजा आणि इच्छा यांतील फरक, नियमित बचतीची सवय, मासिक बजेट, गुंतवणुकीचे प्राथमिक ज्ञान, कर्ज व्यवस्थापन आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षितता या विषयांवर डॉ. पवार यांनी मार्गदर्शन केले. आर्थिक स्वावलंबनासाठी केवळ पैसा कमावणे महत्त्वाचे नसून त्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणेही तितकेच आवश्यक आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व शास्त्री फाऊंडेशनच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले, तर प्रा. करण पावरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सायबर सुरक्षेसोबतच आर्थिक साक्षरतेचे व्यावहारिक ज्ञान देणारी ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षितता, आर्थिक जबाबदारी आणि बचतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.





