एरंडोलमध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण; नगरसेविका छाया दाभाडे यांचा सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी एरंडोल : शहरातील गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका छाया दाभाडे यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज रुग्णवाहिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील व सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर होते.
नगरसेविका छाया दाभाडे यांनी त्यांच्या पती तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी मृणाल पाटील यांनी दाभाडे दांपत्याने वाढदिवसानिमित्त रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित होत असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना तातडीने उपचारासाठी नेणे सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नमूद केले.
नगरसेविका छाया दाभाडे यांनी पालिका निवडणुकीवेळी नागरिकांना दिलेले रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे गटनेते प्रा. मनोज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, उपनगराध्यक्षा सुनीता माळी, नगरसेवक अनिल महाजन, रवींद्र महाजन, अमोल तंबोली, मयूर महाजन, कृष्णा ओतारी, योगेश महाजन, नगरसेविका आरती महाजन, पौर्णिमा देवरे, कमल पाटील, डॉ. गितांजली ठाकूर, सत्यभामा पाटील, मनकर्णा चौधरी, कल्पना पाटील, माजी नगरसेवक रुपेश माळी, अतुल महाजन, बबलू चौधरी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी माजी नगरसेवक पापा दाभाडे, सुरेश दाभाडे, नगरसेवक अमोल तंबोली तसेच मरीमाता चौक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे शहरातील नागरिकांची आरोग्यसेवेतील गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





