शस्त्रासह घरात घुसून जिवेठार मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील खेडी येथील दोन इसमांनी कोयता व कुकरीसारखी धारदार शस्त्रे घेऊन एका शेतकऱ्याच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून त्यांच्या पुतण्यास जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विकास सोनू कोळी हे शेतकरी असून ते पत्नीसमवेत राहत आहेत. त्यांच्या घराशेजारी त्यांचे भाऊ पंढरीनाथ सोनू कोळी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी पुतण्या हर्षल पंढरीनाथ कोळी याच्या मोटरसायकलला कट लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता खेडी येथील बंटी बाळू कोळी व हितेश गोपाल कोळी हे दोघे हातात अनुक्रमे कोयता व कुकरी घेऊन फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. “कोठे आहे तो नकट्या हर्षल, माझ्या भावाच्या मोटरसायकलला कट मारतो काय, त्याला मारतोच,” असे म्हणत त्यांनी पुतण्या हर्षलच्या नावाने अश्लील शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिली. त्या वेळी हर्षल घरी नसल्याने आरोपी तेथून निघून गेले.
या घटनेबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून बंटी बाळू कोळी व हितेश गोपाल कोळी (रा. खेडी, ता. एरंडोल) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एरंडोल पोलीस करीत आहेत.




