नवीन रेशनकार्ड धारकांना तात्काळ धान्य द्या; अन्यथा आंदोलन – रिपाइं आठवले..

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील नवीन रेशनकार्ड धारकांना तात्काळ धान्य वितरण सुरू करावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले च्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीसंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली असता, तालुका स्तरावरून तातडीने अहवाल मागविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एरंडोल तालुक्यातील विद्यमान रेशनकार्ड धारकांना शासनाच्या नियमानुसार दरमहा धान्य वितरित केले जाते. मात्र नव्याने तयार झालेल्या रेशनकार्डांना कोठा लागू करण्यात आलेला नसल्याने संबंधितांना धान्य मिळत नाही. कुटुंब विभक्त झाल्यानंतर किंवा विवाहानंतर अनेकांनी स्वतंत्र रेशनकार्ड काढले असले तरी त्यांना प्रत्यक्षात धान्य मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून ते वंचित राहत आहेत. त्यामुळे नवीन व वाढीव कोठा मंजूर करून सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरणाचे आदेश द्यावेत, तसेच तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने येथे सुस्थिती व सुसूत्रता राखावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा तालुकाध्यक्ष तथा उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समिती सदस्य प्रवीण बाविस्कर आणि महिला आघाडी तालुकाध्यक्ष माया खैरनार यांनी दिला आहे.



