जळगावदेश-विदेशमहाराष्ट्रशेती विषयक

खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज; एरंडोल–पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोल पाटील यांचे मार्गदर्शन


प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल व पारोळा तालुक्यातील खरीप पूर्व हंगाम आढावा बैठक माननीय आमदार अमोल दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह, एरंडोल येथे उत्साहात पार पडली. बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
          तालुका कृषी अधिकारी अरविंद शिवदे (एरंडोल) व दीपक आहेर (पारोळा) यांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी आवश्यक तयारी, नियोजित पिक पद्धती तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व अनुदानाबाबत सादरीकरण केले. यावर उपस्थितांनी सखोल चर्चा केली.
          यावेळी आमदार अमोल पाटील यांनी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते व कृषी औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच गावपातळीवरील बैठका वाढवून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्याचे सांगितले. खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंचन व्यवस्था व पिक संरक्षणासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. उमरे येथील कृषिभूषण समाधान पाटील व चोरवड येथील पुरस्कारप्राप्त शेतकरी मल्हार कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.
            यावेळी आमदारांच्या हस्ते रब्बी पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, तालुका प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच एरंडोल व पारोळा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर साळुंखे यांनी केले, सूत्रसंचालन कुंदन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश लांडगे यांनी केले.
         यावेळी  जिल्हाध्यक्ष शिवसेना वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख रवी जाधव, जिल्हा समन्वयक जगदीश पाटील,  बबलू पाटील, तालुका संघटक संभाजी पाटील, उद्यान पंडित प्रवीण पाटील, प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब पाटील, नागदुली सरपंच अशोक पाटील,  अतुल मराठे, मयूर महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button