एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघात : मोटरसायकलस्वार जागीच ठार

एरंडोल : शहरातील बस स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जवखेडे बुद्रुक येथील विजय सांडू पाटील (वय ५८) हे जामनेर-बोदवड येथे लग्न समारंभासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर ते आपल्या दुचाकी वाहनाने एरंडोल बस स्थानकाजवळील समांतर रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी बस डेपोमधून बाहेर पडणारी धुळे-बुलढाणा मार्गावरील एस.टी. बस (क्रमांक एमएच १४ बीटी ४९८०) जळगावच्या दिशेने निघाली होती.
बस डेपोमधून बाहेर येताना बसची समोरून दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की विजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.
मृत विजय पाटील हे परिसरातील प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. तसेच जवखेडे बुद्रुक येथील पोलीस पाटील दिनकर पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.




