आरोग्यजळगावमहाराष्ट्र

ब्रह्माकुमारीजच्या १० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानास आमदार अमोल पाटील यांचा जाहीर पाठिंबा

एरंडोल : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे राबविण्यात येणारे “१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान” हे स्वस्थ भारत, समृद्ध भारत आणि स्वर्णिम भारताच्या निर्मितीसाठी अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी पाऊल असल्याचे मत एरंडोल-पारोळा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी व्यक्त केले.

त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले की, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या सहकार्याने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगद्वारे देशभरात १० कोटी भारतीयांना नशामुक्तीची प्रतिज्ञा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या राष्ट्रीय अभियानाचे उद्घाटन २ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार असून, हा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.

आमदार अमोल पाटील म्हणाले की, व्यसनमुक्त, मूल्यनिष्ठ आणि सुदृढ समाजाची निर्मिती ही काळाची गरज आहे. समाजात सकारात्मक जीवनशैली रुजविण्यासाठी ब्रह्माकुमारीज करत असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.

यावेळी त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख, शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील प्रतिनिधी, युवक-युवती तसेच सर्व नागरिकांना आवाहन केले की, ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या नशामुक्ती प्रतिज्ञा अभियानासाठी ब्रह्माकुमारीजच्या सेवाधारी बहिणींना पूर्ण सहकार्य करावे. आपल्या संस्थांमध्ये प्रतिज्ञा कार्यक्रमासाठी वेळ उपलब्ध करून द्यावा आणि जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करावा.

“स्वर्णिम भारताच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम नशामुक्त भारताची उभारणी आवश्यक आहे. या अभियानासाठी मी वैयक्तिकरित्या तसेच माझ्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करीन,” असे आश्वासन आमदार अमोल पाटील यांनी दिले.

शेवटी त्यांनी या राष्ट्रीय जनजागृती अभियानाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देत सर्व नागरिकांनी व्यसनमुक्त भारताच्या संकल्पात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button