जिल्ह्यात पहिला आणि महाराष्ट्रात दुसरा क्रमांक कासोदा येथे ७३ वा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात प्रारंभ..

प्रतिनिधी :- प.पू. श्री सदगुरु गोविंद महाराज यांच्या नावाने गेल्या ७३ वर्षांपासून आयोजित होत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह शनिवार दि.१९ सप्टेंबर रोजी कासोदा येथे भक्तिमय वातावरणात सुरू झाला. या वर्षाचे पूजेचे मानकरी म्हणून अमोल सुभाष नवाल ,मच्छिंद्र अरुण गुंजाळ ,भारत उत्तमराव खैरनार ,विजय साळी व
महेश शेनपडू चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक स्थापना करण्यात आली. भटजी म्हणून गणेश मधुकर जोशी यांनी पूजा-अर्चा केली. या सप्ताहात सात दिवस कीर्तनाचे कार्यक्रम होणार असून अखेरच्या दिवशी म्हणजेच शनिवार दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता काकड आरती, नऊ वाजता काल्याचे कीर्तन तसेच दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण गाव तसेच परिसरातील नागरिक उपस्थित राहून धार्मिक उत्सवाचा लाभ घेणार आहेत.७३ वर्षांपासून अखंड सुरू असलेला हरिनाम सप्ताह आजही तेवढ्याच श्रद्धा-भावनेने साजरा केला जातो. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा आणि जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा मान असलेल्या या सप्ताहात जिल्हा बाहेरूनही भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. सकाळच्या काकड आरतीचा सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.
तलावाची महती….महादेव मंदिर परिसरात एक तलाव आहे या तलावाचे पाणी वर्षभर कोणीही पिण्यासाठी वा स्वयंपाकासाठी वापरत नाही.कारण त्या पाण्यात वर्षभर अन्न शिजत नाही.परंतु सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी महाप्रसादासाठी याच पाण्याचा उपयोग होतो. विशेष म्हणजे या दिवशी या पाण्यात शिजवलेले अन्न अतिशय रुचकर व स्वादिष्ट होते.आजवर कोणत्याही भाविकाला त्याचा त्रास झालेला नाही. हीच या ठिकाणची अद्वितीय परंपरा आहे. संध्याकाळी सहा वाजता आरतीनंतर ढोल-ताशे, लेझीम पथक, भजनी मंडळे व पालखी मिरवणुकीने परिसर दुमदुमून जातो. पालखी गावातील तीनही मशिदीवरून जाते.एका मशिदीवर मुस्लिम बांधवांकडून पालखीस श्रीफळ देऊन स्वागत केले जाते व मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येतो. अशा या सप्ताहस सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हरिनाम सप्ताह हिंदु पंच मंडळाने केले आहे.
या कार्यक्रमासाठी कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. श्रीकांत पाटील व पि.एस.आय. धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





