हॉटेल, लॉजमधील देहविक्रीचा आरोप; कारवाईची काँग्रेसची मागणी

पोलीस निरीक्षकांना निवेदन : कारवाई न झाल्यास मोर्चाचा इशारा
प्रतिनिधी एरंडोल : शहरासह तालुक्यातील काही परमिट रूम, बिअर बार, हॉटेल आणि लॉजमध्ये अनधिकृतपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत हा प्रकार तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी एरंडोल तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, काही हॉटेल व लॉजमध्ये परगावाहून महिलांना आणून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी बाहेरगावातील व्यक्तींची वर्दळ वाढली असून, या प्रकारामुळे शहराची व तालुक्याची बदनामी होत असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
या प्रकाराची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित हॉटेल, लॉज व इतर ठिकाणी तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रकारांना आळा न बसल्यास काँग्रेसतर्फे जनजागृती करून मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
हे होते उपस्थित : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष संजय भदाणे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतन पाटील, मदनलाल भावसार, डॉ. प्रशांत पाटील, शेख सांडू शेख महम्मद आदी उपस्थित होते.





