एरंडोलच्या २.५ हेक्टर मियावकी रोपवनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण; उत्कृष्ट कामाबद्दल वनकर्मचाऱ्यांचा सत्कार
एरंडोल : जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढविणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात विकसित करण्यात आलेल्या २.५ हेक्टर मियावकी रोपवनाची जिल्हाधिकाऱ्यांनी रोहन घुगे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाळ, तहसीलदार गोपाळ पाटील, कॉलेजचे अध्यक्ष अमित पाटील. यांची उपस्थिती होती
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मियावकी प्रक्षेत्राची पाहणी करून तेथील वृक्षलागवड, वाढ आणि देखभालीची माहिती जाणून घेतली. त्यांच्या हस्ते मियावकी प्रक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित अधिकारी, वन कर्मचारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
मियावकी पद्धतीने कमी कालावधीत दाट वननिर्मिती करण्यासाठी स्थानिक वृक्षप्रजातींची योग्य निवड, लागवडीची घनता, शास्त्रीय पद्धतीने लागवड, पाणी व्यवस्थापन आणि तणनियंत्रण यांना विशेष महत्त्व आहे. याबाबत सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी मियावकी प्रक्षेत्रावर उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
दरम्यान, एरंडोल येथील मियावकी रोपवनाची उत्कृष्ट निर्मिती व देखभाल केल्याबद्दल वनक्षेत्रपाल मानसिंग राजपूत, नियतक्षेत्र अधिकारी शिवाजीराव माळी तसेच वनमजुरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महाविद्यालय परिसरातील हे मियावकी रोपवन पर्यावरण संवर्धन, जैवविविधता वाढ आणि हरित क्षेत्र निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार असून, विद्यार्थ्यांमध्येही वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे.





