शास्त्री फार्मसी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

प्रतिनिधी : भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे आणि त्यांना ज्ञानार्जनासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके, थोर व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे तसेच वैज्ञानिक साहित्याचा अभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले.
औषधनिर्माणशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबतच औषधनिर्मिती क्षेत्रातील नवनवीन संशोधन, आधुनिक उपचारपद्धती आणि आरोग्यविषयक घडामोडींशी अद्ययावत राहण्यासाठी संदर्भग्रंथ, संशोधनपर लेख आणि वैज्ञानिक नियतकालिकांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथसंपदेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध पुस्तकांचा अधिकाधिक उपयोग करून शैक्षणिक व व्यावसायिक प्रगती साधावी, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्ञानसंपन्न व जबाबदार नागरिक घडविण्याचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.





