भव्य नवचंडी यागाची ‘मंगलमय’ पूर्णाहुती; भाविकांची मांदियाळी

श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवपर्वात आयोजन; मंत्रोच्चार, महाआरतीने आदिशक्तींचा जागर
अमळनेर : शक्ती, भक्ती आणि साधनेचा परम पवित्र उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात भव्य नवचंडी महायागाचे आयोजन केले होते. अतिशय चैतन्यमय आणि मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या महायागाची सायंकाळी पाच वाजता मंत्रोच्चार आणि महाआरतीने पूर्णाहुती करण्यात आली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन सत्रांत नवचंडी यागाचे आयोजन करण्यात आले. हा परम पवित्र पूजा विधी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांत झाला. यामध्ये देवी आदिशक्तींच्या उपासनेसाठी दुर्गासप्तशतीचे पाठ, चंडीपाठ, विशेष मंत्रोच्चार आणि वैदिक यज्ञविधीद्वारा जागर करण्यात आला. या धार्मिक विधींमुळे संपूर्ण मंदिर परिसर जयघोष व वेदघोषाने दुमदुमून गेला होता. प्रथम सत्रात गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, सर्वतोभद्र मंडल, नवग्रह मंडल व रुद्र यांची स्थापना करण्यात आली. तसेच श्री भैरवी माता व नवदुर्गा यांचा अभिषेक करून अर्चन करण्यात आले. तर द्वितीय सत्रात अग्नी स्थापन, नवग्रह हवन, सप्तशती पाठाद्वारे देवींचे हवन, बलिदान, पूर्णाहुती होऊन महाआरतीने सांगती झाली. तत्पूर्वी, नवदुर्गांची कृपादृष्टी राहावी, लक्ष्मीप्राप्ती व्हावी, आयुरारोग्य उत्तम राहावे, यासाठी अष्टमीचे हवन करण्यात आले. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती, भूमीमाता या प्रमुख देवतांवर अभिषेक करण्यात आला. तसेच डाळिंब, ऊस, खीर, पांढरी तीळ यांची आहुती देण्यात आली.
विशेष यजमानांच्या हस्ते पूर्णाहुती व महाआरती
विशेष यजमानांकडून मुख्य यज्ञवेदीवर मंत्रोच्चारात आहुती अर्पण करण्यात आल्या. मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, सौ. आशाताई महाले आणि मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांच्या साक्षीने सायंकाळी पाच वाजता यज्ञाची मुख्य पूर्णाहुती देण्यात आली. त्यानंतर आदिशक्ती माता आणि भगवान श्री कालभैरव-भैरवी माता यांची सामूहिक महाआरती करण्यात आली, ज्याने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. पुरोहित प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, यश जोशी, परशुराम शर्मा, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, तुषार दीक्षित, चंद्रकांत जोशी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, हेमंत गोसावी, अनिरुद्ध कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
पाच देवींचे दिव्य दर्शन
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर प्रशासनातर्फे संपूर्ण परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. श्री मंगळग्रह देवांसोबतच श्री भूमीमाता, श्री पार्वती माता, श्री अनघालक्ष्मी माता, श्री भैरवी माता व श्री लक्ष्मी माता या पाचही देवींच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी अमळनेर, धुळे, जळगावसह ठिकठिकाणच्या भाविकांनी गर्दी केली होती. नवचंडी यागाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा परम पवित्र सोहळा यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेच्या सर्व विश्वस्त, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.
नवरात्रोत्सवात ९ दिवस श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन
नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना झाली. त्यानंतर सोमवार, दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान भगवान श्री कालभैरव-भैरवी माता मंदिरासमोर दररोज सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत विशेष यजमानांच्या हस्ते श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन करण्यात आले. तसेच अमळनेर शहरातील महिला मंडळांतील सदस्यांच्या शुभ हस्ते नऊ दिवस दररोज सायंकाळी महाआरती करण्यात आली.
नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी आलेले विशेष मान्यवर
श्री मंगळ ग्रह मंदिरात नवचंडी महायागाचे केलेल्या आयोजनात जळगाव व धुळे येथील अनेक राजकीय , विधीज्ञ , सामाजिक मंडळींनी लाभ घेतला.





