एरंडोल बसस्थानकात ४ जिजाऊ बसेसचे लोकार्पण!

आमदार मा. ॲड. अमोल पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा संपन्न; बसस्थानकातील सुरू असलेल्या विकासकामांचीही केली पाहणी
एरंडोल : एरंडोल विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एरंडोल बसस्थानकासाठी लोकप्रिय आमदार मा. ॲड. अमोल पाटील यांच्या प्रयत्नांतून प्राप्त झालेल्या ४ जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा आज एरंडोल बसस्थानक येथे आमदार मा. ॲड. अमोल पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
या नवीन बसेसमुळे प्रवाशांना वाहतुकीच्या अधिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, विशेषतः विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्ग आणि ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
यावेळी आमदार मा. ॲड. अमोल पाटील यांनी एरंडोल बसस्थानकात त्यांच्या प्रयत्नांतून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामासह इतर विविध विकासकामांची पाहणी केली. बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि बसस्थानक परिसर अधिक सुविधाजनक व्हावा, या दृष्टीने त्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
प्रवाशांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच बसस्थानकाच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्यावर यावेळी भर देण्यात आला.
याप्रसंगी आगारप्रमुख, एसटी महामंडळाचे चालक-वाहक, प्रवासी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.





