गोशाळेत जनावरे चोरीचा प्रयत्न; दगडफेकीत गाय गंभीर जखमी, पशुवैद्यकीय विभागाची तत्पर मदत

एरंडोल, प्रतिनिधी : तालुक्यातील टोळी खुर्द शिवारातील राजलक्ष्मी गोशाळेत अज्ञात चोरट्यांनी जनावरे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १८ जून रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी जनावरांवर दगडफेक केल्याने एका गायीस गंभीर दुखापत झाली असून तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय एरंडोल अंतर्गत असलेल्या राजलक्ष्मी गोशाळेत काही अज्ञात व्यक्तींनी जनावरे चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जनावरांमध्ये घबराट निर्माण झाली. चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत एक गाय गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली.
घटनेची माहिती मिळताच तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय कासोदा येथील परिचर श्री. नितीन चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी जनावरावर प्रथमोपचार केले. त्यांच्या तातडीच्या उपचारांमुळे जनावराची प्रकृती स्थिर ठेवण्यात मदत झाली.
मात्र, दुसऱ्या दिवशीही सदर गाय उभी राहू शकत नसल्याने १९ जून रोजी पशुधन विकास अधिकारी डॉ. प्राप्ती पारखे व परिचर श्री. नितीन चौधरी यांनी गोशाळेला भेट देऊन जनावराची सखोल तपासणी केली. त्यांनी आवश्यक उपचार करून पशुपालकास पुढील काळजी व उपचारांबाबत मार्गदर्शन केले.
आपत्कालीन परिस्थितीत पशुवैद्यकीय विभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमी जनावराचा जीव वाचविण्यात यश आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गोशाळेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच गोशाळांच्या सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





