हॅलो एरंडोल न्यूजच्या वृत्ताचा परिणाम; स्मशानभूमीत विशेष स्वच्छता मोहीम, नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती…….

एरंडोल प्रतिनिधी – नगरपरिषद तर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या सूचनेनुसार दि. ०९ फेब्रुवारी २०२६ पासून शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील स्मशानभूमीची सखोल साफसफाई करण्यात आली. विशेष म्हणजे, ‘हॅलो एरंडोल न्यूज’ने दोन दिवसांपूर्वी स्मशानभूमीतील अस्वच्छतेबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
मोहिमेदरम्यान स्मशानभूमी परिसरातील साचलेला कचरा, गवतझुडपे आणि अस्वच्छता दूर करण्यात आली. तसेच संबंधित प्रभागातील गटारींचीही साफसफाई करण्यात आली. नगरपरिषदेकडून शहरातील GVP स्पॉट, बगीचे, सार्वजनिक शौचालये तसेच मुतारी यांची टप्प्याटप्प्याने सखोल स्वच्छता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आजच्या स्वच्छता उपक्रमात स्वतः मा. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी उपस्थित राहून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मा. नगरसेवक श्री. कृष्णा ओतारी व मा. नगरसेविका सौ. शारदा मराठे यांनीही प्रत्यक्ष सहभाग घेतला. स्वच्छता कामे अधिक प्रभावी आणि सातत्यपूर्ण पद्धतीने राबविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
स्मशानभूमी हा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक दृष्ट्या महत्त्वाचा परिसर असल्याने तेथे स्वच्छता राखणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ‘हॅलो एरंडोल न्यूज’ने मांडलेल्या प्रश्नामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नगरपरिषदेकडून ही विशेष स्वच्छता मोहीम पुढील काही दिवस सातत्याने राबविण्यात येणार असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




