जळगावमहाराष्ट्र

महावितरण कार्यालयातील लाच मागणी प्रकरण; नगरसेवक नितेश चौधरी यांचे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन

एरंडोल –  येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कार्यालयातील कथित लाच मागणी प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक नितेश चौधरी यांनी जळगाव येथील अधीक्षक अभियंत्यांकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नगरसेवक नितेश चौधरी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या प्रभागातील एका नागरिकाने घरावरील नवीन सौर ऊर्जा (सोलर) प्रकल्पाच्या कामासाठी Release Order मिळविण्यासाठी महावितरण कार्यालय, एरंडोल येथे भेट दिली होती. यावेळी कार्यालयातील कर्मचारी सौ. सोनवणे मॅडम यांनी संबंधित नागरिकाकडे तब्बल दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक नितेश चौधरी यांनी स्वतः महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी संबंधित कर्मचारी यांनी त्यांच्या समोर देखील पैशांची मागणी केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण व्यवहाराचा व्हिडिओ पुरावा देखील रेकॉर्ड करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चौकशीदरम्यान संबंधित कर्मचारी यांनी “मोठ्या साहेबांना देखील द्यावे लागते” असे वक्तव्य केल्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विभागीय उपकार्यकारी अभियंता गेडाम यांचे नाव देखील निवेदनात नमूद करण्यात आले असून, “गेडाम साहेबांशी बोलले तरी चालेल” असे संबंधित कर्मचारी यांनी सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी व्हावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, तसेच दोषींवर कठोर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भविष्यात नागरिक व शेतकऱ्यांना अशा भ्रष्टाचाराचा सामना करावा लागू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणासंदर्भातील व्हिडिओ पुरावा असलेली पेन ड्राईव्ह देखील निवेदनासोबत जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाही पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी नगरसेवक नितेश चौधरी यांच्यासह ॲड. अजिंक्य काळे, ॲड. आकाश महाजन, वैभव चौधरी, करण पाटील, कल्पेश चौधरी, मुकेश चौधरी, सचिन पाटील, ॲड. नयन आरखे, रोहन महाजन व अक्षय चौधरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button