जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोलला CBSE मान्यता; शैक्षणिक क्षेत्रात मोठी झेप..

प्रतिनिधी एरंडोल :-  तालुक्यातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ची मान्यता प्राप्त केली आहे. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे.
शैक्षणिक संस्था उभारणे ही एक मोठी जबाबदारी असते, मात्र ती यशस्वीरित्या पूर्णत्वास नेणे ही अधिक मोठी कसरत असते. हीच जबाबदारी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष प्रसादजी काबरे आणि उपाध्यक्षा पियुषा प्रसाद काबरे यांनी समर्थपणे पार पाडली आहे. CBSE बोर्डाचे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच शाळेला केंद्राची मान्यता मिळणे शक्य झाले.
या प्रवासात काबरे दाम्पत्याला त्यांच्या कुटुंबीयांचा तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोठा पाठिंबा लाभला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच हे यश साध्य झाले आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या मान्यता प्रस्तावामुळे काबरे परिवार, शाळा आणि मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण आहे.
अल्पावधीतच प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलने जळगाव जिल्ह्यात एक नावाजलेली शैक्षणिक संस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करणारी ही संस्था आगामी काळात आणखी प्रगती करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शाळेच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, या यशामुळे एरंडोलच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button