जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंजनी धरण परिसरातील सोनबर्डी गाव पुनर्वसनाला गती : आमदार अमोल पाटील यांची वैयक्तिक पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.


प्रतिनिधी एरंडोल:-  तालुक्याची जीवनवाहिनी ठरलेले अंजनी मध्यम प्रकल्प (अंजनी धरण) हे केवळ पाणीसाठ्याचे साधन नसून शेती, पिण्याचे पाणी व स्थानिक अर्थव्यवस्थेचे मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र गतवर्षी झालेल्या पूर परिस्थितीमुळे धरणाच्या लाभ क्षेत्रालगत असलेल्या मौजे सोनबर्डी गावाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता.
            याच अनुषंगाने आज दि. ३० मार्च २०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबत तसेच जुनी सोनबर्डी गावाच्या पुनर्वसनासाठी योग्य पर्यायी जागा निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
              या बैठकीत आमदार अमोल  पाटील उपस्थित राहून त्यांनी या विषयावर वैयक्तिक लक्ष केंद्रित केले. गावकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुनर्वसनाचा निर्णय व्हावा, तसेच त्यांच्या सर्व अडचणी आणि अपेक्षा लक्षात घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
         बैठकीस मा. जिल्हाधिकारी रोहन घुगे, कार्यकारी अभियंता  उत्तम दाभाडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुंवर, उपअभियंता राजेंद्र पाटील यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
           अंजनी धरणामुळे एरंडोल तालुक्याला मोठ्या प्रमाणात जलसिंचन व पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या धरणाशी निगडित प्रत्येक निर्णय हा तालुक्याच्या विकासाशी थेट संबंधित आहे. सोनबर्डी गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाल्याने भविष्यात पूरपरिस्थितीचा धोका कमी होऊन नागरिकांना सुरक्षित व स्थिर जीवन मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button