आयएएस आकाश त्रिवेदी यांच्याशी ‘दिलखुलास संवाद’; रोटरी क्लबतर्फे विशेष सत्कार..

एरंडोल प्रतिनिधी :- रोटरी क्लब ऑफ एरंडोलच्या वतीने सोमवार, ११ मे २०२६ रोजी आयोजित विशेष क्लब बैठकीत एरंडोलचे भूमिपुत्र तथा आयएएस पदासाठी निवड झालेले आकाश ओम त्रिवेदी यांच्याशी रोटरी परिवारातील सदस्य, विद्यार्थी व पालकांनी दिलखुलास संवाद साधला. यावेळी रोटरी क्लब ऑफ एरंडोल व धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आकाश त्रिवेदी तसेच त्यांच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात रो. प्रा. राखी पाटील व रो. प्रा. डॉ. स्वाती शेलार यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून आकाश त्रिवेदी यांनी आपल्या यशामागील संघर्ष, अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि मेहनतीचे महत्त्व उलगडून सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी करिअरची योग्य वेळी व विचारपूर्वक निवड करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे होणाऱ्या विचलनापासून दूर राहून ध्येयासाठी शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी शैक्षणिक जडणघडण, मित्रांचे सहकार्य, योगा व व्यायामाचे महत्त्व, पालकांचे पाठबळ, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, शेतकरी प्रश्न, देशाचा विकास आणि प्रशासकीय सेवेमधील संधी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. आकाश त्रिवेदी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
आकाश त्रिवेदी यांच्या आयएएसपदी निवडीबद्दल त्यांचा तसेच वडील अॅड. ओम त्रिवेदी व आई रेखा त्रिवेदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच रो. अमितदादा पाटील यांना अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या हस्ते प्राप्त झालेल्या ‘इंडियन्स प्राईड अवॉर्ड २०२६’ बद्दल गौरविण्यात आले.
कार्यक्रमात रोटरी परिवारातील दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. बारावी उत्तीर्ण कु. कृपा हेमंत शर्मा हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन रोटरी न्यू जनरेशन व युथ डायरेक्टर रो. प्रा. डॉ. स्वाती शेलार यांनी केले. रोटरी क्लब अध्यक्ष तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी आकाश त्रिवेदी यांचे यश एरंडोल शहरासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष तथा माजी प्राचार्य प्रा. डॉ. अनिल लोहार यांनी आकाश त्रिवेदी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी धरणगाव रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य सहकुटुंब उपस्थित होते. बैठकीत जळगाव रोटरी कॉन्फरन्स २०२७ नोंदणी तसेच १७ मे रोजी नागपूर येथे होणाऱ्या ‘डिरेक्टर्स कॉन्फरन्स’ बाबतही चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रो. सोपान साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रो. जुमाना बोहरी यांनी केले.




