उत्राण येथे महसूल विभागाची धडक कारवाई ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली गिरणा नदी परिसरातील उत्राण येथे महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत विनापरवाना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील कार्यालयाचे पथक गिरणा नदी परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी उत्राण परिसरातून विनापरवाना वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने तत्काळ कारवाई करत संबंधित ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
या कारवाईदरम्यान संबंधित ट्रॅक्टर चालक व मालकांविरोधात दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाची परवानगी न घेता सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कठोर पावले उचलली आहेत.
दरम्यान, तहसीलदार गोपाळ पाटील यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकी विरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
महसूल विभागाच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या धडक मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.





