दिव्यांगांसाठी यूडीआयडी कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन

१८ जून रोजी एरंडोल येथे विशेष कार्यशाळा; दिव्यांग बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
एरंडोल | प्रतिनिधी – दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयानुसार एरंडोल तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी गुरुवार, दि. १८ जून रोजी सकाळी १० वाजता विशेष यूडीआयडी (Unique Disability ID) कार्ड नोंदणी शिबिर व एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडोल येथील श्री स्वामी समर्थ केंद्र, रामचंद्र नगर (एस.टी. बसस्थानकाच्या पाठीमागे) येथे हे शिबिर पार पडणार आहे.
उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल तहसील कार्यालयामार्फत हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि त्यांची अधिकृत नोंदणी व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या १५ मे २०२६ च्या शासन निर्णयानुसार, ज्या दिव्यांग व्यक्तींकडे जुन्या प्रकारचे अथवा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र (एसएडीएम प्रमाणपत्र) आहे, अशा सर्व दिव्यांगांना ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी नवीन वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी कार्ड) काढणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, एरंडोल विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी तालुकास्तरावर विशेष शिबिरे व जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. जून महिन्यातील तिसऱ्या गुरुवारच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे हे पहिले शिबिर असून, यामध्ये यूडीआयडी कार्ड नोंदणीसह आवश्यक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
प्रशासनाने तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांनी अद्याप यूडीआयडी कार्ड काढलेले नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
चौकट : आवश्यक कागदपत्रे
दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
आधार कार्ड
रहिवासी पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल क्रमांक
यूडीआयडी कार्डमुळे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सवलती व लाभ मिळविणे अधिक सुलभ होणार असल्याने या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





