अपघातजळगावमहाराष्ट्र

एरंडोलमध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, नागरिकांकडून वाहतूक नियंत्रणाची मागणी

एरंडोल : शहरातील काबरे विद्यालय व टेनिस क्लब परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुरा भागातील फकीरवाडा एरंडोल येथे वास्तव्यास असलेले मुस्तकीम शहा रशीद शहा (वय ३५) हे आपल्या दुचाकीने घरी जात असताना शहरातून जाणाऱ्या म्हसावद-नेरी मार्गावरील काबरे विद्यालय व टेनिस क्लब परिसरात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मुस्तकीम शहा यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत मुस्तकीम शहा हे मिस्त्री काम तसेच वाद्य वाजविण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, शहरातून जाणारा म्हसावद-नेरी मार्ग हा अत्यंत वर्दळीचा असून काबरे विद्यालय, टेनिस क्लब, महाविद्यालय, शाळा, बालवाडी तसेच नव्याने विकसित झालेल्या वसाहती या परिसरात असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र, या मार्गावर ट्रक, डंपर आणि अवजड वाहने अनेकदा भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका कायम निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर या मार्गावर गतिरोधक, वेगमर्यादा फलक, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि पोलिसांचा नियमित बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.

सदर ट्रक एरंडोल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, पुढील तपास व कारेवाई एरंडोल पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button