तहसील कार्यालय परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; ४.२० लाखांचा डंपरसह मुद्देमाल जप्त

एरंडोल : तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधातील कारवाईचा धडाका सुरू असून, एरंडोल तहसील कार्यालय परिसरात महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर जप्त केला. या कारवाईत सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकाविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै रोजी पहाटे ३.१५ ते सकाळी ८.३० या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी २० हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू तसेच ४ लाख रुपये किमतीचा टाटा अल्ट्रा एसएलआर (क्र. एमएच-२०-जीसी-२०८३) डंपर असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी वैभव श्रीराम पाटील (वय ४२), ग्रामविकास अधिकारी, एरंडोल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इम्रान नबी पठाण (रा. अंधारी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) तसेच खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम, १९५७ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण पाटील करीत असून, तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





