जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; एरंडोलमध्ये दोन नवीन एसटी विनंती थांबे मंजूर, बसफेऱ्या वाढविण्याचे आश्वासन..

प्रतिनिधी एरंडोल:- प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी शहर संघर्ष समितीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. एरंडोल एसटी आगार प्रशासनाने धरणगाव रोडवरील पेट्रोल पंपाच्या पुढे शहराकडे शाळेजवळ तसेच उड्डाणपुलाजवळ धरणगाव चौफुली येथे दोन नवीन विनंती थांबे मंजूर केले असून, जळगाव-एरंडोल बससेवा नियमित ठेवण्याबरोबरच लवकरच बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्याचे आश्वासनही दिले आहे.

शहर संघर्ष समितीच्या वतीने  आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांना प्रवासी हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. या वेळी समितीचे अध्यक्ष रवींद्र लाळगे, उपाध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण महाजन, संचालक तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत बाविस्कर, दिलीप तावडे, गुलाब चौधरी आणि रवींद्र चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नव्याने रुजू झालेल्या आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांचा संघर्ष समितीतर्फे सत्कारही करण्यात आला.

निवेदनाची तत्काळ दखल घेत आगार व्यवस्थापकांनी जळगाव विभाग नियंत्रकांना माहिती दिली. त्यानंतर विभाग प्रमुखांनी एरंडोल येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित ठिकाणांची पाहणी केली आणि दोन्ही ठिकाणी विनंती थांबे मंजूर करण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय जळगाव-एरंडोल बससेवा नियमित सुरू ठेवण्यासह भविष्यात बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्याबाबतही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच एरंडोल-इंदौर ही लांब पल्ल्याची बससेवा सुरू करण्याच्या मागणीवरही अनुकूल प्रतिसाद देण्यात आला. ही सेवा सुरू झाल्यास शिरपूर, सेंधवा आणि इंदौरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संघर्ष समितीने सांगितले.

आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या सकारात्मक कार्यपद्धतीमुळे एरंडोल एसटी आगार आदर्श डेपो म्हणून विकसित होईल, असा विश्वास संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच प्रवाशांच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष समितीचे समाजहिताचे कार्य यापुढेही सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाही अध्यक्ष रवींद्र लाळगे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button