जळगावधार्मिकमहाराष्ट्र

शहरात महाशिवरात्री व भगवान एकलव्य जयंती भक्तिभावात व उत्साहात साजरी

एरंडोल :-शहरात महाशिवरात्री आणि भगवान एकलव्य जयंतीनिमित्त अध्यात्म, श्रद्धा व सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले. पहाटेपासूनच शहरासह तालुक्यातील सर्व महादेव मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ॐ नमः शिवायच्या गजरात, अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा व भजन-कीर्तनांनी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

शहरातील खोल महादेव मंदिर, अंजनी नदी काठावरील महादेव मंदिर, अष्टविनायक कॉलनीतील महाकालेश्वर महादेव मंदिर तसेच अमळनेर दरवाजा येथील महादेव मंदिर येथे दर्शनासाठी दीर्घ रांगा लागल्या होत्या. विशेषतः अष्टविनायक कॉलनीतील महाकालेश्वर महादेव मंदिर परिसरात उभारण्यात आलेला वीस फुट उंच त्रिशूल-डमरू भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. शिवभक्तांनी रात्रजागरण करत भजन, भक्तीगीत व आरतीत सहभाग नोंदवला.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सामाजिक उपक्रमांनाही चालना मिळाली. बुधवार दरवाजा मित्र मंडळातर्फे फळ आहार वाटप तर जय भोले ग्रुप फाउंडेशनतर्फे साबुदाणा फराळ वाटप, जय बाबाजी भक्त परिवारातर्फे सालाबाजाप्रमाणे ११ क्विंटल साबुदाणा खिचडी वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमांमुळे भक्तीबरोबरच सेवाभावाची शिकवण प्रत्यक्षात उतरवण्यात आली.

दरम्यान, केवडी पुरा परिसरातून भगवान एकलव्य यांच्या पुतळ्यापासून शहरातून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भिल्ल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय एकलव्यच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शौर्य, निष्ठा व गुरुभक्तीचे प्रतीक असलेल्या एकलव्यांच्या जयंतीनिमित्त समाजात आत्मसन्मान व एकतेचा संदेश पोहोचवण्यात आला.

एकंदरीत, महाशिवरात्रीच्या आध्यात्मिक वातावरणात आणि भगवान एकलव्य जयंतीच्या सामाजिक-सांस्कृतिक उत्साहात शहराने श्रद्धा, सेवा व एकोपा यांचा सुंदर संगम अनुभवला. दिवसभर सुरू असलेल्या भजन-भक्ती संध्यांनी शहरातील वातावरण पूर्णतः आध्यात्मिकतेने भारावून गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button