एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आज एक उमेदवारी अर्ज दाखल

प्रतिनिधी – एरंडोल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रक्रियेच्या शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना गुरुवार दि. १४ नोव्हेंबर रोजी एक नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन प्राप्त झाले. गेल्या तीन दिवसांत एकही नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाला नव्हता. मात्र, आज पहिला अर्ज दाखल होताच निवडणूक प्रक्रियेला सुरूवातीची चालना मिळाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १४/११/२०२५ रोजी एकूण १ नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून आरती अतुल महाजन यांनी आपला नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे पुढील दोन–तीन दिवसांत इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज सादर करण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकीत विविध प्रभागांतून कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार असून, उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर २६ नोव्हेंबर रोजी अधिकृत उमेदवारांना निवडणूक चिन्हे वाटप केले जाणार आहेत.
पहिला अर्ज दाखल झाल्याने एरंडोलमधील निवडणुकीचे तापमान वाढू लागले आहे. पुढील दोन दिवसांत कोणत्या पक्षांकडून किंवा अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.




