एरंडोल लोक अदालतीत ५१ प्रकरणे निकाली,३.८३ लाखांहून अधिक रकमेची तडजोड………..!

प्रतिनिधी एरंडोल – तालुका विधी सेवा समिती, एरंडोल यांच्या वतीने शनिवारी १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘ राष्ट्रीय लोक अदालती ‘ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोक अदालतीमध्ये एकूण ५१ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून त्याद्वारे ३,८३,९४७ रुपयांची तडजोड करण्यात आली आहे.
या लोक अदालतीचे उद्घाटन श्रीमती बी. ए. तळेकर (अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश, एरंडोल) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. तर पंच न्यायाधीश म्हणून वकील संघाच्या सचिव ॲड. प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले.यावेळी एरंडोल वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अहेमद जे. सैय्यद यांच्यासह ॲड. अजिंक्य काळे (सहसचिव), ॲड. ए. एम. काळे, ॲड. एम. एम. महाजन, ॲड. आर. एम. दाभाडे.यांच्यासह वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित अशा दोन्ही प्रकारच्या दाव्यांवर सुनावणी घेण्यात आली.यात एकूण ४७ दाखलपूर्व प्रकरणे निकाली निघाली.तर न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांपैकी ४ प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली.असे एकूण ५१ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ३,८३,९४७ रुपयांची वसुली व समझोता झाला.
यावेळी ॲड. आर. आर. सोनार, ॲड. आकाश महाजन, ॲड. डी. डी. पाटील, ॲड. सुजित पाठक,ॲड. दिपक पाटील, ॲड. शेखर खैरनार, ॲड. प्रेमराज पाटील, ॲड. जयेश पिलोरे,ॲड. चंद्रकांत पारखे आणि ॲड. निरज जगताप आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
न्यायालयातील प्रलंबित वाद सामोपचाराने आणि विनाविलंब मिटवण्यासाठी लोक अदालत हे एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे या यशस्वी आयोजनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





