एरंडोल नगरपालिकेचा अभिनव उपक्रम : “डिजिटल डीटॉक्स”साठी दररोज वाजणार सायरन; १४ एप्रिलपासून अंमलबजावणी.

प्रतिनिधी एरंडोल:- शहरातील नागरिकांना मोबाईल, इंटरनेट व टेलिव्हिजनच्या वाढत्या वापरापासून काही काळ दूर ठेवण्यासाठी एरंडोल नगरपालिकेने “डिजिटल डीटॉक्स” ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात १४ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (ज्ञान दिन) पासून करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या काळात एरंडोल शहरात दररोज ठराविक वेळेस सायरन (भोंगा) वाजवून नागरिकांचे दैनंदिन जीवन वेळापत्रकानुसार चालत असे. आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना सावध करण्यासाठीही याचा उपयोग होत होता. मात्र कालांतराने आधुनिक साधनांच्या उपलब्धतेमुळे ही परंपरा बंद झाली होती. आता नगरपालिकेने त्याच सायरनचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी अमोल बागुल, उपनगराध्यक्षा सुनीता माळी, गटनेते प्रा. मनोज पाटील तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या मान्यतेने या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली.
या संकल्पनेनुसार दररोज सायंकाळी ६ वाजता आणि रात्री ८ वाजता सायरन वाजविण्यात येणार आहे. या वेळेत विशेषतः विद्यार्थी, युवक-युवती व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोबाईल, इंटरनेट आणि टेलिव्हिजनपासून दूर राहून वाचन, मैदानी खेळ, व्यायाम किंवा इतर छंद जोपासावेत, असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सध्या वाढत्या “स्क्रीन टाइम”मुळे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युवकांना पुन्हा मैदानी खेळ, वाचन व प्रत्यक्ष संवाद याकडे वळविण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.विशेष म्हणजे, “डिजिटल डीटॉक्स” ही संकल्पना सायरनच्या माध्यमातून राबविणारी एरंडोल नगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरणार आहे.





