अपघातजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
खडके फाट्याजवळ बस-दुचाकी अपघात; प्रसंगावधानामुळे चार जणांचे प्राण वाचले

एरंडोल : एरंडोल–कासोदा रस्त्यावर खडके फाट्याजवळ आज दुपारी भडगाव–धरणगाव बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार, त्यांची पत्नी व दोन लहान मुले जखमी झाली असून सुदैवाने सर्वजण बचावले आहेत. जखमी पावरा कुटुंब हे आडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ एमएच ६९९७ क्रमांकाची भडगाव–धरणगाव बस कासोदा येथून एरंडोलकडे येत असताना खडके फाट्याजवळ एमएच १९ ईटी ४३३९ क्रमांकाच्या दुचाकीला धडक बसली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले.
अपघातात जखमी झालेल्या चौघांना तातडीने खाजगी वाहनाने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे आणि वेळीच उपचार मिळाल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.




