जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोल महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजराडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

प्रतिनिधी एरंडोल : यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब अमितजी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. ए. टी. चिमकर, डॉ. के. जे. वाघ, डॉ. नरेंद्र तायडे, डॉ. स्वाती शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवर तसेच प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या बालपणापासून शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ तसेच देशाचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून केलेल्या कार्याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांचे अनुभव आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा याबाबत त्यांनी प्रभावीपणे मार्गदर्शन केले.
“गुरू म्हणजे केवळ विषय शिकविणारी व्यक्ती नव्हे, तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो,” असे प्राचार्य डॉ. पाटील यांनी सांगितले.
डॉ. ए. टी. चिमकर यांनीही शिक्षकाची भूमिका केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन त्यांना जीवनाची योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करीत असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर कुणाल पाटील, वैष्णवी पाटील आणि वैभवी माळी यांनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. वैभवी माळी हिने शिक्षकांविषयी विशेष गीत सादर केले. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करतो’
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना दादासाहेब अमितजी पाटील यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. “प्राचीन काळातील गुरुकुलातील गुरू असो, मध्ययुगातील आचार्य असो किंवा आजच्या डिजिटल युगातील शिक्षक असो—समाज घडविण्याचे कार्य शिक्षकच करीत आला आहे,” असे त्यांनी सांगितले.
“डॉक्टर रुग्णाचा जीव वाचवतो, अभियंता इमारत उभी करतो, शेतकरी अन्न निर्माण करतो; मात्र या सर्वांना घडविणारा शिक्षक असतो,” असे सांगत शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
“एक चांगला शिक्षक एका विद्यार्थ्याचे जीवन बदलू शकतो आणि एका चांगल्या शिक्षकाने घडविलेली पिढी संपूर्ण समाज बदलू शकते,” असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना मनःपूर्वक अभिवादन करून त्यांनी विद्यार्थ्यांना “शिक्षकांचा सन्मान करा, ज्ञानाचा स्वीकार करा आणि ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करा,” असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती सदैव आदर आणि कृतज्ञतेची भावना जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन दांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बालाजी पवार यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button