जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलला सलग चौथ्यांदा ‘अती उत्तम’ मानांकन प्राप्त

एरंडोल : शास्त्री फाऊंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोल या संस्थेच्या पदविका फार्मसी अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई), मुंबई यांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या शैक्षणिक संस्था अवेक्षण (Academic Monitoring) अहवालामध्ये सलग चौथ्यांदा “अती उत्तम” असे सर्वोच्च शैक्षणिक मानांकन प्राप्त झाले आहे. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा, सातत्यपूर्ण प्रगतीचा आणि उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा हा आणखी एक महत्त्वपूर्ण गौरव मानला जात आहे.

एमएसबीटीईच्या अहवालानुसार संस्थेत सर्व आवश्यक शैक्षणिक सुविधा निकषांनुसार उपलब्ध असून, अभ्यासक्रमाची प्रभावी व दर्जेदार अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, प्रयोगशाळांची उत्कृष्ट सुविधा, शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धी यांची दखल घेत संस्थेला हा मानाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बळावर संस्था भविष्यातही नवनवीन यश संपादन करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांनी या यशाचे श्रेय संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांना देत, गुणवत्ता वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबीवर संस्था सातत्याने कार्यरत राहील, असे सांगितले.

उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी संस्थेतील उच्च शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापनातील नावीन्य, संशोधनाभिमुख वातावरण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे संस्थेला हा प्रतिष्ठेचा दर्जा प्राप्त झाल्याचे सांगितले.

विभागप्रमुख श्री. जावेद शेख यांनी उद्योग-शिक्षण समन्वय अधिक बळकट करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येतील व सर्व विभाग त्यासाठी समन्वयाने कार्य करतील, असे नमूद केले.

संस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, एरंडोलने गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षणातील आपले अग्रस्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button