क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

अंजनविहीरेच्या शिरपेचात सुवर्णमय तुरा, माजी सैनिकाच्या सुपुत्राची ‘आयआयटी धनबाद ‘मध्ये गगनभरारी….!  साई पाटील ठरला गावातील पहिला ‘ आयआयटीयन …….!

एरंडोल ( प्रतिनिधी) :- जिद्द, चिकाटी आणि सैनिकी शिस्तीच्या बळावर ग्रामीण भागातील तरुणही यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकतात, हे अंजनविहीरे ता. भडगाव येथील साई महेंद्र पाटील याने सिद्ध केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साईने जे.ई.ई. ॲडव्हान्स परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवले असून, देशातील नामांकित ‘ भारतीय तंत्रज्ञान संस्था, धनबाद ‘ येथे बी.टेक. जिऑलॉजिकल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश निश्चित केला आहे. या ऐतिहासिक यशासह तो अंजनविहीरे या गावातील पहिला ‘ आयआयटीयन ‘ बनण्याचा मानकरी ठरला आहे.
साईचे कुटुंब मूळचे शेतकरी पार्श्वभूमीचे आहे. त्याचे आजोबा आजही शेतात घाम गाळतात, तर वडील महेंद्र साहेबराव पाटील यांनी भारतीय सैन्यात सलग २४ वर्षे अहोरात्र देशसेवा केली आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सध्या ते एरंडोल येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. घरातून मिळालेली सैनिकी शिस्त, वडिलांचे देशसेवेचे संस्कार आणि आजोबांची कष्टाळू वृत्ती यातूनच साईला अभ्यासाची खरी प्रेरणा मिळाली.
गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी सायन्सचा विद्यार्थी असलेल्या साईने अभ्यासात सुरुवातीपासूनच सातत्य ठेवले. मर्यादित सुविधांची तमा न बाळगता त्याने स्वयंअध्ययनावर भर दिला आणि १२ वीच्या परीक्षेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमानही मिळवला.
“वडिलांची देशसेवा आणि कुटुंबाचे कष्ट मी खूप जवळून पाहिले आहेत. ग्रामीण भागात सोयी-सुविधा कमी असल्या तरी योग्य नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर स्वप्न साकार करता येते, हे मला सिद्ध करायचे होते. माझे हे यश आई-वडील आणि सर्व शिक्षकांना समर्पित आहे.”
— साई महेंद्र पाटील
साईच्या या अलौकिक यशाबद्दल अंजनविहीरे, गिरड आणि संपूर्ण एरंडोल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, त्याच्या भावी शैक्षणिक प्रवासासाठी सर्वस्तरातून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button