जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईच्या भीतीने एरंडोल शहरातील अनेक व्यावसायिकांनी ठेवले शटर डाउन?


प्रतिनिधी | एरंडोल – एरंडोल शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक तपासणीसाठी येणार असल्याची माहिती शहरात पसरताच अनेक किराणा दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, हॉटेल्स, पान सेंटर मेडिकल स्टोअर्स तसेच चहा स्टॉल अचानक बंद ठेवण्यात आल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा व मानक कायद्यांतर्गत अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, परवाने आणि नियमांचे पालन याबाबत तपासणी होणार असल्याची माहिती काही व्यावसायिकांना मिळाली. त्यानंतर काही व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील विविध भागांमध्ये सकाळपासून अनेक दुकाने बंद दिसून आली. त्यामुळे नागरिकांमध्येही विविध चर्चांना उधाण आले. काही नागरिकांनी प्रशासनाच्या अशा कारवायांचे स्वागत करत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर नियमित नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. तर काही व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे मत व्यक्त केले.
अन्न व औषध प्रशासनाकडून अधिकृत तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे का, तसेच कोणत्या आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button