जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

मातीपासून गणपती घडविताना पर्यावरण संवर्धनाचा धडा

एरंडोलमध्ये शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी : एरंडोल गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण. या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश एरंडोल नगरपरिषदेने दिला. ‘मातीपासून मूर्ती घडवूया आणि निसर्गाचे रक्षण करूया’ या संकल्पनेतून नगरपरिषदेतर्फे ९ सप्टेंबर रोजी कर्मवीर अभ्यासिका येथे शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला १०० पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळे दरम्यान मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व, शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे पर्यावरणीय फायदे तसेच जलप्रदूषण टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, बागुल यांनी स्वतः शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
नगरसेवक व नगरसेविकांनीही कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभाग घेत शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या. लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्रितपणे मूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.
कार्यशाळेत उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यशाळेत नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी, नगरसेवक मनोजभाऊ पाटील, आनंदभाऊ दाभाडे, रविंद्र महाजन तसेच नगरसेविका सत्यभामाबाई पाटील, मणकरनाबाई चौधरी, भारती गुजर व शारदा मराठे यांनी सहभाग नोंदविला.
‘शाडू मातीचा गणपती घडवूया, जलप्रदूषण टाळूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया’ हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने एरंडोल शहराने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी कार्यालयीन अधिकारी एस. आर. ठाकूर, सुमित उमराने, हितेश जोगी, जीवन जाधव, विवेक कोळी व महेश विसपुते यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button