दादासाहेब दि. शं. पाटील महाविद्यालयात हिंदी पंधरवाडा संपन्न,

पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत २३ विद्यार्थ्यांचा सहभाग; मनोज जोगी प्रथम.
एरंडोल – येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथे हिंदी विभागाच्या वतीने हिंदी पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सुमारे २३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत मनोज जोगी याने प्रथम, सायली माळी हिने द्वितीय, स्नेहल सोनार हिने तृतीय, तर कावेरी महाजन हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पुस्तके स्वरूपात पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मातृभाषेबरोबरच हिंदी भाषेचे ज्ञान आणि तिच्याबद्दल आदर असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी स्पर्धेच्या युगात भाषिक कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर यांनी जागतिकीकरणाच्या युगात हिंदी भाषेचे वाढते महत्त्व स्पष्ट केले.
हिंदी विभागप्रमुख डॉ. स्वाती शेलार यांनी प्रास्ताविकातून हिंदी पंधरवड्याचे महत्त्व व आयोजित उपक्रमांची माहिती दिली. डॉ. नरेंद्र तायडे व डॉ. रेखा साळुंखे यांनी पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे परीक्षण केले. प्रथम वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थिनी हर्षदा पाटील हिने सूत्रसंचलन केले, तर द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी अदिती पाटील हिने आभार मानले.पल्लवी पाटील व पल्लवी महाजन यांनी स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ए. टी. चिमकर, डॉ. राम वानखेडे, डॉ. मीना काळे, डॉ. सोपान साळुंखे, प्रा. सागर विसपुते, डॉ. सविता पाटील व शेखर पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





