जळगावताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्र

शहरासह ग्रामीण भागात उत्साहाला उधाण; ढोल-ताशांच्या गजरात श्रींच्या आगमन मिरवणुका

एरंडोल : गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला शहरासह ग्रामीण भागात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सकाळपासूनच विविध गणेश मंडळांच्या श्रींच्या आगमन व स्थापना मिरवणुकींना सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम, आकर्षक देखावे आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. संध्याकाळपर्यंत विविध भागांत स्थापना मिरवणुकांची लगबग सुरू होती.

शहरात शंभरहून अधिक मंडळांकडून स्थापना

शहरात १९ सार्वजनिक रजिस्टर गणेश मंडळांसह सुमारे ९० ते ९५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली. जय गुरु व्यायाम शाळा, सावता माळी व्यायाम शाळा, बालवीर मित्र मंडळ, नागराज मित्र मंडळ, बालमित्र व्यायाम शाळा गणेश मंडळ, सर्वोदय गणेश मंडळ, ज्ञानदीप मित्र मंडळ, श्रीराम गणेश मंडळ, चौक गणेश मंडळ, माहेश्वरी नवयुवक गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी गणेश मंडळ, संताजी गणेश मंडळ, हरीपुरी नवयुवक गणेश मंडळ, बालाजी गणेश मंडळ, ब्राह्मण वृंद नवयुवक गणेश मंडळ, नम्रता गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ, बालवीर गणेश मंडळ, मरी माता गणेश मंडळ, पांडव वाडा गणेश मंडळ, ओम नमः शिवाय गणेश मंडळ यांच्यासह अन्य मंडळांनी उत्साहात श्रींची प्रतिष्ठापना केली.

२२ ते २४ फुटांच्या भव्य मूर्ती ठरल्या आकर्षण

यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील प्रमुख मंडळांनी २२ ते २४ फुटांपर्यंतच्या आकर्षक व भव्य गणेशमूर्तींची स्थापना केली आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये या मूर्तींचे विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. विविध मंडळांनी स्थापना स्थळी आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट आणि देखावे साकारले असून गणेशोत्सव काळात सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

बाजारपेठेत सकाळपासून गर्दी

गणेशमूर्ती, पूजासाहित्य, फुले, हार, सजावटीचे साहित्य व इतर साहित्य खरेदीसाठी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गणेशोत्सव आणि हरतालिका या दोन्ही धार्मिक पर्वांचा एकत्रित उत्साह बाजारपेठेतही जाणवत होता.

मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

श्रींच्या आगमन व स्थापना मिरवणुका पाहण्यासाठी शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ढोल-ताशे, विविध वाद्यपथके, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय वातावरणामुळे मिरवणुकांना उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनीही विविध मंडळांच्या स्थापना कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तसेच होमगार्ड जवानांनी प्रमुख मार्ग, चौक व मिरवणूक मार्गांवर बंदोबस्त ठेवला. त्यामुळे गणेशभक्तांनी उत्साहात आणि शांततेत श्रींचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button