कासोदा परिसरात प्रतिबंधित ‘HTBT’ कापूस बियाण्यांवर धडक कारवाई ; ९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी एरंडोल :- तालुक्यातील कासोदा परिसरात कृषी विभाग व कासोदा पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या मोठी धडक कारवाई करत अनधिकृत ‘HTBT’ (तणनाशक सहनशील) कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे ९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, योगेश बळवंत पाटील (रा. सौंदाणे, जि. धुळे) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित ‘HTBT’ कापूस बियाण्यांची छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार ७ मे २०२६ रोजी कृषी विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्त छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान ‘प्रीमियम रिसर्च हायब्रीड कॉटन सीड’, ‘श्री गणेशा + ५जी’ आणि ‘आकाश + ५जी’ या नावाने असलेली तब्बल ४०० बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. या बियाण्यांची किंमत अंदाजे ४ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच बियाण्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी मारुती स्विफ्ट डिझायर कारही जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे.
या प्रकरणी योगेश बळवंत पाटील आणि नितीन देवरे (रा. वाडीभोकर, जि. धुळे) यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर बियाणे कायदा १९६६ व बियाणे नियम १९८८, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, कापूस बियाणे अधिनियम २००९ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, एरंडोल तालुका कृषी अधिकारी निखिल टोळकर, धरणगाव तालुका कृषी अधिकारी परेश बडगुजर तसेच कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे अनधिकृत बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी अधिकृत व प्रमाणित बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




