के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आनंदोत्सवाची रंगत

खाद्य महोत्सव, संस्कृती रांगोळी व विविध कलात्मक उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव
एरंडोल : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी परिपूर्ण आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थाध्यक्ष अमित पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या आनंदोत्सवांतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कला, संस्कृती, रांगोळी तसेच विविध कलात्मक व सर्जनशील उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेचा व कलागुणांचा सुंदर आविष्कार सादर केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, संघभावना आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली.
खाद्य महोत्सवात इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल उभारले. विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांची निवड, तयारी, मांडणी, विक्री तसेच ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. विविध चविष्ट पदार्थांनी सजलेले स्टॉल उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, डॉ. स्वाती शेलार, प्राचार्य दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर, शेखर पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. तसेच खाद्य महोत्सवातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे आवश्यक असून, शिक्षणासोबत कला, संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यावहारिक जीवनकौशल्यांचा संगम या आनंदोत्सवातून साधण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





